
रायगड, 12 जून (हिं.स.) : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या प्रलंबित मागण्या, प्रशासकीय अडचणी आणि सेवा विषयक विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी किशन जवाळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपस्थित होते.
बैठकीदरम्यान कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी जावळे यांनी संबंधित विभागांशी थेट संपर्क साधून काही प्रकरणांमध्ये तत्काळ निर्णय घेत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला.
सरळ सेवा भरतीतील अनुशेष पदे भरणे, अनुकंपा भरती प्रक्रियेला गती देणे, आश्वासित प्रगती योजना, प्रलंबित वैद्यकीय बिले, निलंबन व पेन्शन प्रकरणांचा निपटारा तसेच बदली आणि पदस्थापना यांसारख्या मुद्द्यांवर या बैठकीत विचारविनिमय झाला.
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी देणे, पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविणे आणि दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना आधारकार्ड उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही महासंघाच्या वतीने करण्यात आली.
जिल्हाधिकारी जावळे यांनी प्रशासन कास्ट्राईब महासंघाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून कोणताही प्रश्न प्रलंबित राहणार नाही यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
बैठकीस महासचिव सुरेश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष संजीव मोरे, महसूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सूर्यवंशी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)