
अमरावती, 11 जून (हिं.स.)। श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून आषाढी वारीनिमित्त मानाच्या पायदळ पालखी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवारी (ता. १९) दुपारी चार वाजता होणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूरच्या वतीने आयोजित हा पालखी सोहळा २९ जुलैपर्यंत पंढरपूर येथे पोहोचणार आहे. वर्धा नदीच्या तीरावर वसलेल्या या पुरातन तीर्थक्षेत्राला ऐतिहासिक, धार्मिक आणि पौराणिक महत्त्व लाभले आहे. संत सद्गुरू सदाराम महाराज यांनी १५९४ मध्ये कौंडण्यपूर ते पंढरपूर ही पायदळ वारी सुरू केली. त्यानंतर अखंडपणे सुरू असलेल्या या परंपरेला यंदा ४३२ वे वर्ष पूर्ण होत आहे. आई रुक्मिणी मातेच्या माहेरातून निघणारी ही महाराष्ट्रातील एकमेव मानाची पालखी मानली जाते. श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्वस्त मंडळ आणि वारकरी पंचकमिटी यांच्या नेतृत्वाखाली हा पालखी सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी