
लातूर, 11 जून, (हिं.स.)। हेल्मेट वापरा, जीवन वाचवा हा संदेश औसा-लातूर मार्गावरील एका गंभीर अपघातातून पुन्हा अधोरेखित झाला आहे. मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या चालकाने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका डॉक्टरांचा गंभीर अपघात झाला. मात्र त्यांनी हेल्मेट परिधान केले असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
औसा-लातूर रोडवरील नायरा पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. फिर्यादी डॉ. रंजीत गणपत नारायणकर (वय ३१), रा. विवेकानंद चौक, लातूर हे मोटारसायकलवरून प्रवास करत असताना इर्टिगा कार (MH-25 BA-6142) चालक पंडीत भारत पवार, रा. शिवणी चौक, धाराशिव याने मद्यप्राशन करून निष्काळजीपणे व भरधाव वेगात वाहन चालवत त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात डॉ. नारायणकर जखमी झाले असून त्यांच्या मोटारसायकलचे सुमारे ₹४० हजारांचे नुकसान झाले. तसेच त्यांच्या बॅगेतील वैद्यकीय साहित्य व लॅपटॉपचे अंदाजे ₹१ लाख ७४ हजारांचे नुकसान झाले आहे. एकूण सुमारे ₹२ लाख १४ हजारांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी वाहनचालकाविरुद्ध गु.र.नं. ३०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डॉ. नारायणकर यांनी हेल्मेटचा वापर केला होता. त्यामुळे गंभीर दुखापत किंवा जीवितहानीची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी झाली. हेल्मेट हे केवळ नियमपालनासाठी नसून जीवनरक्षक कवच असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये तसेच दुचाकीस्वारांनी दर्जेदार हेल्मेटचा नियमित वापर करावा, असे आवाहन औसा पोलिसांकडून करण्यात आले आहे. एक क्षणाचा निष्काळजीपणा आयुष्यभराची वेदना ठरू शकतो; मात्र हेल्मेटचा एक साधा निर्णय एखाद्याचा जीव वाचवू शकतो, हे औसा येथील घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
-----
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis