जागृती शुगरकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अंतिम हप्ता जमा; एकूण 210 कोटींचे वितरण
लातूर, 11 जून (हिं.स.)। देवणी तालुक्यातील जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेडने 2025-26 गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अंतिम हप्त्यापोटी प्रतिमेट्रिक टन ₹312.16 इतकी रक्कम गुरुवारी (दि. 11 जून) त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली आहे. य
जागृती शुगर


लातूर, 11 जून (हिं.स.)। देवणी तालुक्यातील जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेडने 2025-26 गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अंतिम हप्त्यापोटी प्रतिमेट्रिक टन ₹312.16 इतकी रक्कम गुरुवारी (दि. 11 जून) त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कारखान्याने यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना एकूण सुमारे ₹210 कोटींचे ऊस बिल अदा केले असून, मराठवाडा आणि विदर्भातील खाजगी साखर उद्योगांमध्ये एफआरपीपेक्षा अधिक दर देणाऱ्या कारखान्यांमध्ये जागृती शुगरचा समावेश असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना अधिक दर देण्याची परंपरा कायम राखण्यात आल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

या यशामागे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि चेअरमन तथा कार्यकारी संचालक गौरवी अतुल भोसले (देशमुख) यांच्या नेतृत्वाचे कौतुक शेतकरी वर्गाकडून केले जात आहे.

कारखान्याने 2025-26 गाळप हंगामात एकूण 6 लाख 64 हजार 8 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून, 6 लाख 90 हजार 500 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. बी-हेवीसह सरासरी 12.004 टक्के साखर उतारा मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच कारखान्याने आतापर्यंत 2 कोटी 52 हजार युनिट वीज निर्यात करून सहउत्पादन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

राज्य शासनाच्या 15 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार अंतिम साखर उतारा व ऊसतोड-वाहतूक खर्च विचारात घेऊन एफआरपी निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार जागृती शुगरचा अंतिम ऊसदर ₹3162.16 प्रतिमेट्रिक टन निश्चित झाला होता. यापूर्वी शेतकऱ्यांना ₹2850 प्रतिमेट्रिक टन इतका दर देण्यात आला होता. उर्वरित ₹312.16 प्रतिमेट्रिक टन रक्कम आता जमा करण्यात आली आहे.

संबंधित ऊस पुरवठादारांनी आपापल्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे आणि सरव्यवस्थापक गणेश येवले यांनी केले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande