खरीप हंगामापूर्वी खत, बियाणे आणि कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ
अमरावती, 11 जून (हिं.स.) : खरीप हंगाम तोंडावर आला असताना रासायनिक खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. खतांच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असून काही संकरित बियाण्यांच्या किमतीतही
खरीप हंगाम तोंडावर; कर्जाशिवाय शेती करणे झाले कठीण उत्पादन खर्च वाढला; शेतकऱ्यांमध्ये चिंता


अमरावती, 11 जून (हिं.स.) : खरीप हंगाम तोंडावर आला असताना रासायनिक खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. खतांच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असून काही संकरित बियाण्यांच्या किमतीतही 10 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते आणि कीटकनाशकांवर प्रतिहेक्टर सुमारे 20 हजार रुपयांपर्यंत खर्च येत आहे. उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतीची आर्थिक घडी विस्कटत चालली आहे.

विशेषतः कापूस, सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत असून यंदाच्या वाढीव खर्चामुळे त्यांची चिंता अधिक वाढली आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीककर्ज मिळविताना अनेक शेतकऱ्यांना विविध अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही अनेक ठिकाणी लाभार्थी यादीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने नवीन कर्जासाठी शेतकऱ्यांना वारंवार बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

बाजारात डीएपी, युरिया आणि पोटॅश खतांच्या किमती वाढल्या असून काही भागांत कृत्रिम टंचाई आणि काळाबाजाराच्या तक्रारीही समोर येत आहेत. याशिवाय कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांच्या बियाण्यांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार आणखी वाढला आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केल्याने खरीप हंगामाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पेरणीसाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार असताना पावसाबाबतची साशंकता शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे.

परिस्थिती लक्षात घेता खत आणि बियाण्यांवरील अनुदान वाढवावे, जीएसटीमध्ये सवलत द्यावी तसेच खतांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी खालील प्रमाणात बियाण्यांची आवश्यकता आहे:-

पीक बियाण्यांची गरज

सोयाबीन 65 हजार क्विंटल

कापूस 1.25 लाख बियाणे पाकिटे

तूर 4,760 क्विंटल

मका 7,072 क्विंटल

ज्वारी 450 क्विंटल

मूग 51.6 क्विंटल

उडीद 76.8 क्विंटल

भात व भुईमूग 486 क्विंटल

खरीप हंगामाच्या तयारीदरम्यान वाढता उत्पादन खर्च, कर्जपुरवठ्यातील अडचणी आणि अनिश्चित हवामान यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असून शासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande