
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन
मुंबई, 11 जून (हिं.स.) - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत सुरु असलेली एसटी महामंडळाची बैठक वादळी ठरल्याचं समोर आलं आहे. आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी महामंडळाच्या बैठकीत एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. चर्चा सुरु असताना सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर डाॅ. कुसेकर यांच्या अंगावर धावून गेल्याचं समोर आलं आहे. मात्र, मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या मध्यस्थीमुळं मोठा अनर्थ टळला. एमडी यांना बैठकीतून बाहेर काढा, असा आग्रह पडळकर आणि खोत यांनी केला. याशिवाय या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी मंत्री प्रताप सरनाईक आणि डाॅ. कुसेकर यांच्यावर टीका केली. तर, याच बैठकीतून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे.
एसटी महामंडळाने, मंत्री महोदयांनी आमच्या आंदोलनानंतर बैठक बोलावली. मात्र, वेगळं ठरवून काही लोकांना बोलावण्यात आले, 53 वरुन 58 झाल्याचं सांगत टाळ्या वाजवा सांगून घरी जावा असं सांगितलं गेलं. अनेक विषय होते, पगारवाढ, घरभाडे, मागील थकलेली देणी. काही कामगारांना विनाकारण निलंबित करण्यात आलं होतं, अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला होता, यावर चर्चा व्हायला पाहिजे होती. पाठीमागच्या चर्चांवर कारवाई झालेली नाही. या सगळ्याला जबाबदार एमडी आहे. एमडी सुद्धा या भ्रष्टाचाराच्या गंगेत रोज अंघोळ करत असेल. भ्रष्टाचार करण्यासाठी असा माणूस बसवला असेल तर या बैठकीत कशाला बसायचं? त्याला हकलून लावा मग आम्ही बसतो अशी भूमिका आम्ही घेतली, असं सदाभाऊ खोत म्हणाले. मला वाटलं होतं की प्रताप सरनाईक यांच्यासारखा कणखर परिवहन मंत्री मिळाला, पण माझ्या लक्षात आलं की ते गटार गंगेचे, भ्रष्टाचाराचे साक्षीदार व्हायला लागले आहेत, याचं आम्हाला प्रचंड दु:ख आहे.
दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी फोन केला होता. फोन स्पीकरवर टाकत मंत्री प्रताप सरनाईकांनी शिंदेशी संवाद साधला. एकनाथ शिंदेंनी कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी