
अमरावती, 11 जून (हिं.स.) : जून महिन्याचा पहिला आठवडा कोरडा गेल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा वाढली आहे. पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून मेळघाटातील पाणीटंचाईची समस्या अद्याप कायम आहे. वाढत्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर आणखी चार गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
दरवर्षी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदा मात्र फेब्रुवारी महिन्यापासूनच परिस्थिती गंभीर बनली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यात जलसंकट अधिकच तीव्र झाले आहे.
सध्या तालुक्यातील 13 गावांना 26 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गावांतील विहिरींमध्ये टँकरचे पाणी सोडले जात असल्याने पाणी भरण्यासाठी नागरिकांची, विशेषतः महिलांची, दिवसभर गर्दी होत आहे.
चिखलदरा पंचायत समितीचे पाणीपुरवठा अधिकारी आदित्य तारू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांत आणखी चार गावांमध्ये टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांमध्ये मोथा, खडीमल, गौलखेडा बाजार, बहाद्दरपूर, आकी, मेहरियम, आलाडोह, लवादा, गवळीढाणा, कालिदा, मसोंडी, बोरी आणि जामली वन या गावांचा समावेश आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर व्यापक आराखडा तयार केला आहे. त्यानुसार:
संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे : 545
नळयोजना : 537
हातपंप : 1,772
खासगी विहिरींचे अधिग्रहण : 143
टँकरद्वारे पाणीपुरवठा होणारी गावे : 16
नळयोजनांची विशेष दुरुस्ती : 286
नवीन सिंचन विहिरी व कूपनलिका : 97
स्रोत बळकटीकरणाची कामे : 126
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्नेहा धावडे यांनी सांगितले की, ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्या ठिकाणी मागणीनुसार टँकर उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच अनेक ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
त्यांनी सांगितले की, लवकर आणि समाधानकारक पाऊस झाल्यास सध्याच्या जलसंकटात मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी