पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘स्मार्ट सारथी’ सेवा आता व्हॉट्सॲपवर
पुणे, 11 जून (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘स्मार्ट सारथी’ सेवा आता व्हॉट्सॲपवर उपलब्ध करण्यात आली असून नागरिकांना अधिक सुलभ आणि जलद सेवा देण्याच्या दिशेने महापालिकेने आणखी एक पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर महापालिकेमार्फत सुरू असलेले सर्व विकास
PCMC


पुणे, 11 जून (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘स्मार्ट सारथी’ सेवा आता व्हॉट्सॲपवर उपलब्ध करण्यात आली असून नागरिकांना अधिक सुलभ आणि जलद सेवा देण्याच्या दिशेने महापालिकेने आणखी एक पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर महापालिकेमार्फत सुरू असलेले सर्व विकास प्रकल्प निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत डॉ. सूर्यवंशी बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर यांच्यासह विभाग प्रमुख, क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी ऑनलाइन सहभागी झाले होते.

प्रकल्प व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध आणि परिणामकारक करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांचा दर सोमवारी नियमित आढावा घेतला जाईल, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

बैठकीत अग्निशमन विभागाकडे प्राप्त होणाऱ्या इमारतींच्या ना-हरकत दाखल्यांच्या (एनओसी) अर्ज प्रक्रियेचाही आढावा घेण्यात आला. अर्जांची तपासणी व मंजुरी प्रक्रिया निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करून नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून द्यावी. तसेच ही प्रक्रिया अधिक सुलभ व कार्यक्षम करण्यासाठी स्वतंत्र मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या.

फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्याबाबतही आयुक्तांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी योग्य आणि सुरक्षित जागांची पाहणी करून फेरीवाला क्षेत्र निश्चित करावे. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन त्यांच्या सूचना आणि अभिप्राय विचारात घ्यावेत, जेणेकरून नियोजन स्थानिक गरजांनुसार अधिक व्यवहार्य ठरेल, असे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande