रायगड - 15 जूनपासून शाळांची घंटा; बाजारपेठांमध्ये शालेय साहित्य खरेदीची लगबग
रायगड, 11 जून (हिं.स.)। सव्वा महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर 15 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असून जिल्हाभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यान
School bells to ring from June 5; bustle in markets for purchasing school supplies.


रायगड, 11 जून (हिं.स.)। सव्वा महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर 15 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असून जिल्हाभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने अलिबागसह जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.

पुस्तके, वह्या, दप्तर, गणवेश, कंपास बॉक्स आणि अन्य शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांसह विद्यार्थ्यांची दुकानदारांकडे मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. विक्रेत्यांच्या माहितीनुसार, मागील पंधरा दिवसांपासून खरेदीला सुरुवात झाली असून सध्या ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र यंदा शालेय साहित्यांच्या किमतीत सरासरी दहा टक्क्यांनी वाढ झाल्याने पालकांच्या खर्चात भर पडली आहे.

दरम्यान, रायगड जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील दोन लाख 256 विद्यार्थ्यांसाठी दहा लाख 89 हजार पाठ्यपुस्तकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी आठ लाख तीन हजार 63 पुस्तके जिल्ह्यात दाखल झाली असून उर्वरित पुस्तकांचा पुरवठा सुरू आहे.

शाळांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यासाठी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शाळांच्या प्रवेशद्वारांना तोरणे, रांगोळ्या तसेच विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाणार आहे. अनेक ठिकाणी प्रभातफेरी काढून शिक्षणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

याशिवाय जिल्ह्यातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षण विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी शाळा सज्ज झाल्या असून विद्यार्थ्यांमध्येही नव्या वर्ग, नवीन पुस्तके आणि मित्रांच्या भेटीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande