तळजाई परिसरात थरारक गोळीबार; जिम मालकावर तीन गोळ्या झाडून कोयत्याने हल्ला
पुणे, 11 जून (हिं.स.)। सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळजाई डोंगर परिसरात थरारक गोळीबाराची घटना घडली. जिम मालक व ट्रेनर असलेल्या एका तरुणावर चौघांनी पाठलाग करून तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला. मात्र गोळ्या लक्ष्या
तळजाई परिसरात थरारक गोळीबार; जिम मालकावर तीन गोळ्या झाडून कोयत्याने हल्ला


पुणे, 11 जून (हिं.स.)।

सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळजाई डोंगर परिसरात थरारक गोळीबाराची घटना घडली. जिम मालक व ट्रेनर असलेल्या एका तरुणावर चौघांनी पाठलाग करून तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला. मात्र गोळ्या लक्ष्यावर न लागल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह चौघांना ताब्यात घेतले आहे.

योगेश बनेकर (वय ३४, रा. धनकवडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य थोपटे आणि त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश बनेकर यांचा बिबवेवाडी परिसरात जिम व्यवसाय आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी धनकवडी भागात वाहन पार्किंगच्या कारणावरून त्यांचा आरोपींसोबत वाद झाला होता. त्या वादातून झालेल्या शिवीगाळीचा राग आरोपींच्या मनात असल्याने हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बुधवारी रात्री जिम बंद करून घरी निघालेल्या योगेश बनेकर यांनी तळजाई डोंगराजवळील बिकानेर चौकात फळे खरेदी करण्यासाठी थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. पहिली गोळी त्यांच्या मानेजवळून गेली. गोळीबार होताच परिसरात घबराट पसरली आणि योगेश यांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली.

मात्र आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवत आणखी दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने दोन्ही गोळ्या लक्ष्यावर लागल्या नाहीत. त्यानंतर एका आरोपीने कोयत्याने वार केल्याने योगेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांनी प्रतिकार करत जीव वाचवला.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांत आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande