
लातूर, 11 जून (हिं.स.)।
: मशिदीत झोपलेल्या भाविकांचे मोबाईल चोरून पोबारा करणाऱ्या एका सराईत चोराला लातूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. शेरू चांदपाशा शेख (वय ४०, रा. अंजली नगर, लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.
मुरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरगाव काळे येथील 'मस्जिद-ए-रहमद येथे ही चोरीची घटना घडली. अब्दुलकादर बहादूर सय्यद (वय ३३) आणि त्यांचा मित्र मशिदीत विश्रांती घेत असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळचे Vivo Y29 5G आणि iPhone 11 असे एकूण ३६,००० रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सायबर सेलच्या तांत्रिक मदतीचा करिष्मा
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून लातूरचे पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी सदर गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सायबर सेल लातूरच्या तांत्रिक मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासांतच आरोपी शेरू शेख याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
आरोपीकडून जप्त केले आणखी दोन मोबाईल
पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेले ३६,००० रुपयांचे दोन मोबाईल हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे, आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याच्याकडे अधिकचे दोन मोबाईल (किंमत २०,००० रुपये) मिळून आले. हे अतिरिक्त मोबाईल त्याने कोठून आणि कोणत्या गुन्ह्यात चोरले आहेत, याचा तपास आता सहायक पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.
सदर कारवाईमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले असून, लातूर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis