महाराष्ट्रातील कॅटर्सच्या एकजुटीसाठी नाशिकमध्ये ‘स्नेह कुंभ २०२६’
नाशिकमध्ये प्रथमच राज्यस्तरीय परीषदेचे आयोजन नाशिक, 11 जून (हिं.स.)। महाराष्ट्रातील कॅटरिंग व्यावसायिकांची एकजूट अधिक मजबूत करण्यासह उद्योगासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी नाशिकमध्ये प्रथमच ‘स्नेह कुंभ २०२६’ या दोन दिवसीय परिषद व
Sneh Kumbh 2026’ in Nashik


नाशिकमध्ये प्रथमच राज्यस्तरीय परीषदेचे आयोजन

नाशिक, 11 जून (हिं.स.)। महाराष्ट्रातील कॅटरिंग व्यावसायिकांची एकजूट अधिक मजबूत करण्यासह उद्योगासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी नाशिकमध्ये प्रथमच ‘स्नेह कुंभ २०२६’ या दोन दिवसीय परिषद व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १४ व १५ जून रोजी गंगापूर रोड परिसरात होणाऱ्या या मेळाव्यास राज्यभरातून सुमारे ७०० ते ८०० सभासद उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया कॅटर्स (एफएआयसी), महाराष्ट्र कॅटरिंग असोसिएशन आणि कॅटरिंग असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या स्नेह कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे देशातील कॅटरिंग क्षेत्रातील प्रमुख तीन संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार असल्याने कार्यक्रमाला राष्ट्रीय स्तराचे महत्त्व प्राप्त झाले आहे.या दोन दिवसांच्या परिषदेत कॅटरिंग व्यवसायासमोरील अडचणी, सदस्यांना भेडसावणारे प्रश्न, बदलते तंत्रज्ञान, मनुष्यबळाची उपलब्धता तसेच उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा होणार आहे. नवोदित कॅटरिंग उद्योजकांना मार्गदर्शन करून उद्योगातील नव्या संधींची माहितीही देण्यात येणार आहे.या परिषदेमुळे नाशिकमधील हॉटेल व्यवसाय, फूड टेक्नॉलॉजी क्षेत्र आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. कॅटरिंग उद्योगामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असून या क्षेत्राच्या विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरवर्षी अशाच स्वरूपाचा स्नेहमेळावा आयोजित करण्याचाही मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

कॅटरिंग असोसिएशन नाशिकच्या पुढाकाराने नाशिकमध्ये प्रथमच ‘स्नेह कुंभ नाशिक २०२६’ परिषदेचे आयोजन १४ व १५ जून रोजी करण्यात आले आहे. याबाबतची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष उत्तमराव गाढवे, उपाध्यक्ष संदीप सोनार, पंकज पाटील आणि सचिव वैभव नातू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चौकट पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अमरावती, सातारा, सांगली, कोकणसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सदस्य या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यातील कॅटर्समध्ये संवाद वाढून एकजूट निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.कॅटरिंग असोसिएशन नाशिकचे समिती सदस्य सागर गाढवे, अमर वाणी, दिनेश अमनकर, राहुल भावे, मंदार तगारे, भास्कर दिंडे, स्वप्निल शिंदे, अविनाश जोशी, नितीन सोनार, नितीन जोशी आदींची यजमान टीम कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त असून नियोजनाची जोरदार तयारी सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande