
अमरावती, 11 जून (हिं.स.) : भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या आणि वाद यांचे समीकरण अजूनही घट्ट असल्याचा प्रत्यय आज अमरावतीत आला. किरीट सोमय्या हे अमरावती महापालिकेत बैठकीसाठी येत असताना एमआयएमच्या नगरसेवकांनी त्यांना जोरदार विरोध केला आणि घोषणाबाजी केली. त्यामुळे महापालिका परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच एमआयएमच्या काही नगरसेवकांनी किरीट सोमय्या यांच्या वाहनासमोर आडवे होत त्यांची वाट अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या नगरसेवकांना लगेच ताब्यात घेतले.
महापालिकेत प्रचंड घोषणाबाजी महापालिकेच्या परिसरात किरीट सोमय्या यांच्या वाहनांचा ताफा येताच एमआयएमचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी ‘किरीट सोमय्या वापस जाओ’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. यावेळी भाजपचे आणि एमआयएमचे कार्यकर्ते आमने-सामने आले. पण, यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना पांगवले. एमआयएमचे नगरसेवक विरोधाच्या घोषणा देत किरीट सोमय्या यांच्या वाहनापर्यंत पोहचले. ते चक्क वाहनासमोर रस्त्यावरच झोपले. त्यांना हटविण्यासाठी पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. किरीट सोमय्या हे अमरावती महापालिकेत बैठकीसाठी येणार असल्याने पोलिसांनी आधीच चोख बंदोबस्त ठेवला होता. एमआयएमच्या आंदोलनानंतर या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
किरीट सोमय्या हे कोणत्याही संवैधानिक पदावर नाहीत, त्यामुळे त्यांना महापालिकेत बैठक घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असाा आरोप एमआयएमच्या नगरसेवकांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकांना ताब्यात घेतले आहे. किरीट सोमय्या हे वारंवार अमरावतीत येऊन महापालिकेत बैठका घेतात, यावर काँग्रेसनही आक्षेप घेतला होता. किरीट सोमय्या हे वारंवार जिल्ह्यात येऊन येथील पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरत आहेत. त्यांच्यावर दबाव आणत आहेत. काही प्रकरणांमध्ये खोट्या दाखल्यांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचे पुढे आले आहे. त्यात यंत्रणेमार्फत पोलीस तक्रारही झाली आहे. परंतु त्या प्रकरणांतही कुणी बांगलादेशी किवा रोहिंग्याशी संबंधित असल्याचे पुढे आले नाही. त्यामुळे सोमय्या यांनी जाणीवपूर्वक अमरावती जिल्ह्याची बदनामी करीत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
महसूल यंत्रणा धास्तावलेली किरीट सोमय्या यांच्यामुळे महसूल यंत्रणा धास्तावलेली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण पात्र असताना व दाखले देण्याबाबतचा बंदी आदेश मागे घेण्यात आल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. सध्या शैक्षणिक कामकाजासाठी विद्यार्थ्यांना अनेक दाखल्यांची गरज आहे. मात्र त्यांना ती दिली जात नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची अडवणूक थांबवावी, अशी मागणी एमआयएम च्या नगरसेवकांनी केली आहे.. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी