लातूर - अहमदपूरमध्ये शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण प्रशासनाकडून जमीनदोस्त
लातूर, 11 जून (हिं.स.) अहमदपूर येथील मौजे मरशिवनी शिवारातील शासकीय गायरान जमिनीवर करण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण ११ जुन रोजी दुपारी अहमदपूर तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करत काढले. मौजे मरशिवनी येथील गट क्रमा
अहमदपूर


लातूर, 11 जून (हिं.स.) अहमदपूर येथील मौजे मरशिवनी शिवारातील शासकीय गायरान जमिनीवर करण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण ११ जुन रोजी दुपारी अहमदपूर तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करत काढले. मौजे मरशिवनी येथील गट क्रमांक २६/१/१ मधील ही जागा उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रस्तावित असल्याने प्रशासनाने या कारवाईला अत्यंत गांभीर्याने घेतले होते.

गेल्या १० ते १५ दिवसांपासून या गट क्रमांकावर काही नागरिकांकडून अनधिकृतरीत्या अतिक्रमण केले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या गंभीर प्रकाराची दखल घेत स्थानिक प्रशासनाने संबंधित अतिक्रमणधारकांना वेळोवेळी तोंडी सूचना दिल्या होत्या आणि स्वतःहून हे अतिक्रमण काढून घेण्याबाबत बजावले होते. मात्र, संबंधित व्यक्तींनी प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर ११ जून रोजी दुपारी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने हे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या जमिनीवर हे अतिक्रमण करण्यात आले होते, ती जागा यापूर्वीच प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आली आहे. जनहितार्थ असलेल्या या प्रकल्पाच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande