
अमरावती, 11 जून (हिं.स.) : कुपोषण निर्मूलनासाठी अंगणवाड्यांमध्ये वितरित करण्यात येणाऱ्या शेंगदाणा चिक्कीच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पथ्रोट येथील वार्ड क्रमांक 6, खोडगाव रस्ता परिसरातील अंगणवाडी केंद्रातून वितरित करण्यात आलेल्या शेंगदाणा चिक्कीत अळ्या आणि सोंडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी निकिता दांडगे या आपल्या तीन वर्षीय मुलगा विश्वसाठी पोषण आहार घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रात गेल्या होत्या. अंगणवाडी सेविकेकडून त्यांना तीन महिन्यांचा शेंगदाणा चिक्कीचा साठा देण्यात आला.
घरी परतल्यानंतर मुलाला चिक्की खाण्यासाठी देण्यापूर्वी पाकीट उघडले असता त्यामध्ये पांढऱ्या अळ्या आणि लाल रंगाच्या सोंडे फिरताना दिसल्या. हा प्रकार पाहून कुटुंबीय हादरले.
महिला व बालविकास विभागामार्फत शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार पुरविला जातो. अशा परिस्थितीत निकृष्ट किंवा दूषित अन्नपदार्थांचे वितरण झाल्यास बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पालकांनी आरोप केला आहे की, पोषण आहाराचे वितरण करण्यापूर्वी संबंधित यंत्रणेकडून आवश्यक तपासणी करण्यात आलेली दिसत नाही. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक तसेच पुरवठादारांनी गुणवत्तेची खात्री करणे आवश्यक असताना या प्रकरणात दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या संदर्भात पंचायत समिती अचलपूर येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी वैभवकुमार मापते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनेचा पंचनामा करून सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
लाभार्थी माता निकिता दांडगे यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि पुरवठादारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी सांगितले की, “अंगणवाडीतून मिळालेली शेंगदाणा चिक्की पूर्णतः निकृष्ट दर्जाची होती. त्यात अळ्या आणि सोंडे होत्या. वेळेवर लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी.”
दरम्यान, या घटनेमुळे अंगणवाड्यांमधील पोषण आहाराच्या गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन याप्रकरणी कोणती कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी