
रत्नागिरी, 11 जून (हिं.स.) । शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत कोकणातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा कोणताचा लाभ मिळणार नसल्याने अशा कर्जदारांना सरसकट कर्जमाफी मिळावी अशी मागणी आज झालेल्या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक नेहा माने यांनी केली आहे.
योजनेतील त्रुटी असल्याने आज संगमेश्वर तालुक्यातील विविध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष. उपाध्यक्ष, सचिव व मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात कोकणातील शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफी यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मांडलेले ठळक मुद्दे असे :
ज्या शेतकऱ्यांने 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 उचल केली परंतु ज्यांनी व जे शेतकरी ३१ मार्च २०२५ ला थकबाकी होते अशा शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च २०२६ या कालावधीत आपल्या कर्जाची पूर्णफेड केली व पूर्णफेड करुन संस्था अगर बँक एन.पी.ए. मध्ये जाऊ नये म्हणून संस्थेला व बँकेला सहकार्य केले अशा सर्व शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा कोणताचा लाभ मिळणार नाही. अशा कर्जदारांना सरसकट कर्जमाफी मिळावी. सन २०२२-२३, सन २०२३ २४ व सन २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही २ आर्थिक वर्षात नियमित असणाऱ्या सभासदाला लाभ मिळणार आहे. परंतु ज्याने या तीनपैकी कोणत्याही एका वर्षात कर्जाची उचल करून ज्याने मुदतीत कर्जाची पूर्णफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळणार नाही. तो मिळावा.
यापूर्वी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ व महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या कर्जमाफी योजनेतील पात्र सभासदांना आजपर्यंत सुमारे १५-२० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहनपर रक्कमेचा लाभ मिळालेला नाही. तो मिळावा 1 एप्रिल २००७ ते 31 मार्च २००९ या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची आजतागायत शासनाने कर्जमाफी न केल्यामुळे असे सर्व शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. ज्या शेतकऱ्यांनी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेला आहे, अशा शेतकऱ्यांना नव्या थकबाकीसाठी फक्त 50 हजार रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तो त्याला दोन लाखापर्यंत मिळावा. सन २०१९-२०२०, सन २०२० २१ व सन २०२१-२२ या कालावधीत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन मुदतीत कर्ज पूर्णफेड केले आहे, असे सर्व शेतकरी प्रोत्साहनपर योजनेतून वंचित राहत आहेत. त्यांनाही योजनेचा लाभ मिळावा.
तसेच 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले त्या कालावधीत फार्मर आय डी घेणे हा नियम नव्हता. त्यामुळे कर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचा फार्मर आय डी ग्राह्य धरण्यात यावा. या मुद्द्यांचा सहानभूतिपूर्वक विचार व्हावा व सर्व लाभार्थी शेतकरी यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली. तसे निवेदन मुख्यमंत्री व. सहकारमंत्री यांना देण्यात येणार आहे. बैठकीला संचालक नेहा माने, राजेंद्र सुर्वे यांच्यासह तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी व मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी उपस्थित होते. ---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी