
लातूर, 12 जून (हिं.स.)।
उदगीर-लातूर राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट न घातल्यामुळे एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीचे फारसे नुकसान झाले नसूनही, केवळ डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे वाहनचालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा आणि हेल्मेटच्या अनिवार्य वापराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर-लातूर रोडवरील लोहारा गावाच्या पश्चिमेस हा अपघात घडला. कुमठा गावाकडून येणाऱ्या दुचाकीस्वाराची धडक करडखेलकडे जाणाऱ्या लहु मारुती डोंबाळे (वय ३५, रा. गणेशवाडी) यांच्या दुचाकीशी झाली. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या लहु डोंबाळे यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
वाहनाचे किरकोळ नुकसान, पण डोक्याला गंभीर मार
घटनास्थळी पोलिसांनी केलेल्या पाहणीत एक धक्कादायक बाब समोर आली. अपघातात मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले नव्हते. वाहनाच्या मागील बाजूस कोणतेही नुकसान नव्हते, तर समोरील बाजूला केवळ हेडलाईटच्या काचेचे किरकोळ नुकसान झाले होते. धडकेचे स्वरूप T आकाराचे होते. विशेष म्हणजे, मयताच्या शरीरावर इतर कोणत्याही गंभीर जखमा नव्हत्या. केवळ रस्त्यावर पडताना डोक्याला जोरदार मार लागल्याने आणि डोक्यावरील गंभीर जखमेमुळेच त्यांचा मृत्यू झाला, हे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
वडिलांचा आक्रोश: हेल्मेट असते तर मुलगा जिवंत असता
घटनास्थळी उपस्थित असलेल्या मयताच्या वडिलांनी अपघाताची पाहणी केली असता, आपल्या मुलाचा मृत्यू हेल्मेट नसल्यामुळेच झाल्याचे पाहून त्यांचा बांध फुटला. माझ्या मुलाने हेल्मेट घातले असते तर तो आज शंभर टक्के जिवंत असता. हेल्मेट न घालणे हीच त्याची मोठी चूक ठरली, असे म्हणत त्यांनी व्यक्त केलेला आक्रोश उपस्थित उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारा होता.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
या घटनेनंतर पोलिसांनी सर्व दुचाकी वाहनचालकांना कळकळीचे आवाहन केले आहे की, हेल्मेट हे केवळ दंडाची कारवाई टाळण्यासाठी नसून ते आपल्या जिवाच्या संरक्षणासाठी आहे. वाहन चालवताना नेहमी दर्जेदार हेल्मेट वापरावे आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. या अपघाताबाबत नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis