
रायगड, 12 जून (हिं.स.)। रक्तदान हे मानवतेचे सर्वोच्च दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे तीन ते चार रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे स्वैच्छिक, विना मोबदला आणि नियमित रक्तदानाची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे आवाहन जागतिक रक्तदाता दिनानिमित्त करण्यात आले आहे.
महान शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांनी 1900 मध्ये ABO रक्तगट प्रणालीचा शोध लावून आधुनिक रक्तसंक्रमण विज्ञानाची पायाभरणी केली. त्यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी 14 जून हा दिवस जगभर जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या वर्षीचा संदेश आहे, मानवतेचा एक थेंब रक्त द्या, जीव वाचवा. अपघातग्रस्त, कर्करोगग्रस्त, थॅलेसेमिया व हिमोफिलिया रुग्ण, मोठ्या शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती तसेच प्रसूतीदरम्यान रक्तस्राव झालेल्या मातांसाठी रक्तदान जीवनदायी ठरते.
आधुनिक वैद्यकीय उपचारांमध्ये रक्तासोबत प्लाझ्मा, प्लेटलेट्स आणि इतर रक्तघटकांचीही मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते.तज्ज्ञांच्या मते, रक्तदानामुळे दात्याच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. उलट नियमित आरोग्य तपासणीची संधी मिळते आणि समाजोपयोगी कार्य केल्याचे समाधान लाभते. देशातील सुरक्षित रक्तपुरवठा अधिक मजबूत करण्यासाठी युवक-युवतींनी तसेच पात्र महिलांनी नियमित रक्तदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
डिजिटल युगात सोशल मीडिया रक्तदान जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरत आहे. रक्तदान शिबिरांची माहिती प्रसारित करणे, गरजू रुग्णांना तातडीची मदत उपलब्ध करून देणे आणि नवीन रक्तदाते जोडणे यासाठी त्याचा सकारात्मक उपयोग होऊ शकतो.
स्वैच्छिक आणि विना मोबदला रक्तदान ही सुरक्षित रक्तपुरवठ्याची सर्वात विश्वासार्ह गुरुकिल्ली आहे. त्यामुळे 14 जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त प्रत्येकाने नियमित रक्तदानाचा संकल्प करून मानवतेच्या या महान कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन रक्तकेंद्र, अलिबाग-रायगडचे रक्तपेढी तंत्रज्ञ हेमकांत सोनार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)