
चंद्रपूर, 12 जून (हिं.स.) : सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून बालरुग्णांसाठी कर्करोग निदान सुविधा उपलब्ध करून देत 94 बालकांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे प्रेरणादायी कार्य अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने केले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने 2025-26 या आर्थिक वर्षात शिक्षण, आरोग्य सेवा आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये विविध सीएसआर उपक्रम राबविले आहेत. शिक्षण क्षेत्राला विशेष प्राधान्य देतानाच आरोग्य क्षेत्रातही कंपनीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
देशभरातील कर्करोगाचा संशय असलेल्या बालरुग्णांना तातडीच्या निदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने टाटा मेमोरिअल हॉस्पिटलांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘कर्करोगाचा संशयित आजार असलेल्या बालरुग्णांसाठी आपत्कालीन निदान सहाय्य सेवा’ या योजनेसाठी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. या सहाय्यामुळे देशभरातील 94 बालकांना वेळेवर कर्करोग निदान आणि आवश्यक वैद्यकीय तपासण्या उपलब्ध झाल्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कर्करोगासारख्या गंभीर आजारामध्ये वेळेवर निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असते. आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना आवश्यक वैद्यकीय तपासण्या करणे शक्य होत नाही. अशा वेळी अफकॉन्सने दिलेली मदत ही केवळ आर्थिक सहाय्य नसून बालकांच्या उपचार प्रक्रियेला गती देणारी आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणारी ठरली आहे.
शासनाच्या विकास प्रयत्नांना उद्योग क्षेत्राची साथ मिळाल्यास आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाची उद्दिष्टे अधिक वेगाने साध्य होऊ शकतात, असे नमूद करत त्यांनी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागीदारी अधिक बळकट करण्याची गरज व्यक्त केली.
कॉर्पोरेट क्षेत्राच्या सामाजिक बांधिलकीचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रात अफकॉन्सने केलेल्या गुंतवणुकीचेही कौतुक केले. समाजातील दुर्बल घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा सीएसआर उपक्रमांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव