
रायगड, 12 जून (हिं.स.)। मत्स्यव्यवसाय विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील युवकांसाठी सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन तसेच डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या विषयांवरील सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रायगड-अलिबाग येथे 1 जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी इच्छुक युवकांनी 30 जून 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी महेश खरात यांनी केले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन संचालनासंदर्भातील सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 1 जुलै ते 31 डिसेंबर 2026 असा सहा महिन्यांचा असेल.
प्रवेशासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा तसेच शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड व रेशनकार्डाच्या प्रती जोडणे आवश्यक आहे. उमेदवार हा क्रियाशील मच्छिमार असून त्याला किमान एक वर्षाचा मासेमारीचा अनुभव असावा. अर्जावर संबंधित मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस आवश्यक असून उमेदवारास पोहता येणे बंधनकारक आहे.
प्रशिक्षण शुल्क प्रतिमाह 450 रुपये असून सहा महिन्यांसाठी एकूण 2 हजार 700 रुपये भरावे लागतील. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांसाठी हे शुल्क प्रतिमाह 100 रुपये असून सहा महिन्यांसाठी 600 रुपये राहील. त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांचा दारिद्र्यरेषेखालील असल्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) योजनेंतर्गत अर्थसाहाय्य घेऊन मच्छिमारी नौका उभारता येणार असून सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील सागरी नौकांवर खलाशी म्हणून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात.
अर्जाचा नमुना मिळविण्यासाठी महेश किसन खरात (मो. 7758969112) किंवा धीरज शहुराव भोयर (मो. 9860254943) यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरून संबंधित संस्थेची शिफारस घेऊन 30 जून 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत व्हॉट्सअॅप किंवा ई-मेलद्वारे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)