पीएम सेतू योजनाःऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण; रोजगारक्षम कौशल्यासाठी उद्योगांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर, 12 जून (हिं.स.)। प्रधानमंत्री सेतू या योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण करुन रोजगारक्षम कौशल्य विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योगांचा सहभाग घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील पाच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची
पीएम सेतू योजनाःऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण; रोजगारक्षम कौशल्यासाठी उद्योगांचा सहभाग


छत्रपती संभाजीनगर, 12 जून (हिं.स.)।

प्रधानमंत्री सेतू या योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण करुन रोजगारक्षम कौशल्य विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योगांचा सहभाग घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील पाच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., सहसंचालक व्यवसाय शिक्षण प्रदीप दुर्गे, उपसंचालक रमण पाटील, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अभिजीत आलटे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार सत्यभूषण गोसावी आदी उपस्थित होते.

पीएम सेतू ही केंद्र पुरस्कृत योजना असून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण करुन त्यांचे आधुनिक, उद्योगाभिमुख व रोजगारक्षम कौशल्य संस्थांमध्ये रुपांतरीत करणे हा उद्देश आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर आणि पैठण,गंगापुर, फुलंब्री व खुलताबाद येथील आयटीआय अशा पाच संस्थांचे मिळून एक क्लस्टर विकसित केले जाणार आहे. या पाच आयटीआय मध्ये मिळून शिकणाऱ्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना या रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाचा ५० टक्के, राज्य शासनाचा ३३ टक्के व उद्योगांचा १७ टक्के निधी खर्च केला जाणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात विकसित करावयाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची निवड झाली असून पुढील टप्प्यात उद्योगांचा सहभाग मिळविला जाणार आहे. त्यासाठी एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत संयुक्त प्रयत्न केले जातील.उद्योगांशी समन्वय तयार करुन उद्योगांना आवश्यक कौशल्यनुसार रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करुन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल,असे यावेळी सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande