
धुळे, 12 जून, (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कार्यकाळातील विकास, जनकल्याण, कृषी, पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, सांस्कृतिक पुनरुत्थान आणि जागतिक स्तरावरील भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेचा आढावा घेतला. चाळीसगाव रोड चौफुली येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर मायादेवी परदेशी, स्थायी समिती सभापती लता सोनार, महिला व बालकल्याण समिती सभापती उज्वला ठाकरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, सुवर्णा पाटील, डॉ. सुशील महाजन, हिरामण गवळी, ओमप्रकाश खंडेलवाल, श्यामसुंदर पाटील, देवेंद्र पाटील, नारायण पाटील, यशवंत येवलेकर यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयकुमार रावल म्हणाले की, २०१४ पासून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत असून गेल्या १२ वर्षाभरात जनतेचा विश्वास सातत्याने वाढत गेला आहे. २०१४ आणि २०१९ नंतर २०२४ मध्येही जनतेने मोदी यांच्या नेतृत्वाला कौल देत सलग तिसर्यांदा सत्ता दिली. सरकारने राष्ट्रहित सर्वोच्च मानून घेतलेल्या निर्णयांमुळे आणि जनतेशी कायम ठेवलेल्या संवादामुळे हा विश्वास दृढ झाल्याचा दावा त्यांनी केला. मोदी सरकारच्या विकासकामांचा उल्लेख करताना ना. रावल यांनी ग्रामीण रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे विद्युतीकरण, वंदे भारत एक्स्प्रेस, मेटे नेटवर्क, नवीन विमानतळांची उभारणी आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये झालेली वाढ अधोरेखित केली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पीएम किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी क्षेत्रातील विविध उपाययोजनांमुळे शेतकरी अधिक सक्षम झाल्याचे त्यांनी सांगितले. जनकल्याणाच्या क्षेत्रात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, जनधन योजना, मुद्रा योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, स्वनिधी योजना, विश्वकर्मा योजना आणि महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध उपक्रमांमुळे कोट्यवधी नागरिकांना थेट लाभ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसून लाभाथ्यारपयरत मदत थेट पोहोचत असल्याचेही ते म्हणाले.
सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पंचतीर्थ, जनजातीय गौरव दिवस, स्टॅच्यू ऑफ युनिटी, नवीन संसद भवन, कर्तव्य पथ, अयोध्या राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल लोकआणि केदारनाथ पुनर्बाधणी यांसारख्या प्रकल्पांचा उल्लेख करत मोदी सरकारने भारताच्या सांस्कृतिक अस्मितेला नवी ओळख दिल्याचा दावा रावल यांनी केला. जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढल्याचे सांगताना त्यांनी जी-२० अध्यक्षपद, व्हॅक्सीन मैत्री उपक्रम, वाढलेली परकीय गुंतवणूक, मुे व्यापार करार, डिजिटल व्यवहारांतील विक्रमी वाढ आणि भारताच्या चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे झालेल्या वाटचालीचा उल्लेख केला. विश्वास, विकास आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित मोदी सरकारची १२ वर्षे भारताच्या परिवर्तनाची कहाणी आहे. विकसित भारताच्या दिशेने देश आत्मविश्वासाने वाटचाल करत असून २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र घडविण्याचा संकल्प जनतेच्या सहभागातून पूर्ण होईल,फ असा विश्वास जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर