विकासकामांमध्ये गुणवत्ता राखण्यात यावी खोलापूर-म्हैसपूर भेटीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले निर्देश
अमरावती, 12 जून (हिं.स.)। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी भातकुली तालुक्यातील खोलापूर व म्हैसपूर या गावांना भेट देऊन विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, स्वच्छता व पायाभूत सुविधांबाब
विकासकामांमध्ये गुणवत्ता राखण्यात यावी खोलापूर-म्हैसपूर भेटीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले निर्देश


अमरावती, 12 जून (हिं.स.)। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी भातकुली तालुक्यातील खोलापूर व म्हैसपूर या गावांना भेट देऊन विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, स्वच्छता व पायाभूत सुविधांबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत कामांमध्ये गुणवत्ता व गती राखण्याचे निर्देश दिले.

खोलापूर येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राला भेट देऊन त्यांनी आरोग्यसेवा, उपलब्ध पायाभूत सुविधा तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. दवाखान्यातील सर्व वैद्यकीय उपकरणे व संगणक यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासोबतच औषध वितरण आणि इतर कार्यालयीन कामकाज पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या बळकटीकरणासाठी प्रशासनामार्फत छत दुरुस्ती करण्यात येणार असून ग्रामपंचायतच्या माध्यमातून इन्व्हर्टर, ऑपरेशन थिएटरसाठी वातानुकूल यंत्रणा तसेच अत्याधुनिक मॉड्युलर ओटी उभारण्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. आशा कार्यकर्त्यांसाठी बैठक हॉल उभारण्याबाबत बांधकाम विभागाने अंदाजपत्रक सादर करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच अंगणवाडी केंद्रालाही भेट देऊन सुविधांची पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या.

गावातील दुग्ध व्यवसायाचे वाढते प्रमाण लक्षात घेता महिला बचतगटांनी दुग्ध उत्पादन व्यवसायासाठी गट स्थापन करून उद्योग सुरू करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी प्राथमिक आरोग्यकेंद्र, खोलापूरला राष्ट्रीय स्तरावरील एनक्यूएएस पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच भातकुली तालुक्यातील ४८ पैकी ४७ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. दरम्यान, ग्रामपंचायतीने मॉन्सूनपूर्व तयारी पूर्ण करावी, सोबतच गावातील सर्व नाल्यांची साफसफाई करून तसा अहवाल सादर करण्याचे सूचित केले. त्यानंतर म्हैसपूर येथे भेट देऊन जनसुविधा योजनेतून उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवनात उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. तसेच जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शैक्षणिक व भौतिक सुविधांचा आढावा घेतला.

गावातील आरओ पाणी शुद्धीकरण केंद्राची पाहणी करताना त्यांनी स्वतः कॉईन टाकून पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याची खात्री केली. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन घरकुल बांधकामांची पाहणी केली. लाभार्थ्यांच्या घरांवर सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पाहणी दौऱ्यादरम्यान स्मशानभूमी परिसरालाही भेट देऊन तेथे ग्रामपंचायतने वृक्षारोपण करून नागरिकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे निर्देश दिले. तसेच गावातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी मोठ्या क्षमतेचा शोषखड्डा उभारण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande