
परभणी, 12 जून (हिं.स.)। अन्नभेसळ ओळखणे, सुरक्षित अन्नाविषयी जनजागृती करणे आणि विद्यार्थी तसेच ग्राहकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ अभियानांतर्गत पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालयात विशेष प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृह परिसरात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्राणेश येवतीकर होते. यावेळी सहाय्यक आयुक्त (अन्न) अनंत कुमार चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी वैभव ठोंबरे तसेच अन्न विश्लेषक सतीश बाधाडे यांनी विद्यार्थ्यांना विविध खाद्यपदार्थांमधील भेसळ ओळखण्याच्या वैज्ञानिक पद्धतींची प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली. कार्यक्रमात अन्नसुरक्षेचे महत्त्व, ग्राहकांचे अधिकार, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्नाची निवड तसेच अन्नभेसळीमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
दूध, पनीर, दुग्धजन्य पदार्थ, मसाले, खाद्यतेल आणि इतर अन्नपदार्थांतील संभाव्य भेसळ ओळखण्यासाठी करण्यात येणार्या चाचण्यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले. अन्नसुरक्षेबाबत प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने हा उपक्रम उपयुक्त ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास डॉ. निकम, डॉ. लोंढे, डॉ. सूर्यवंशी, शेतकरी उत्पादक संस्थांचे सदस्य, महाविद्यालयीन कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. अन्नसुरक्षेबाबत जागरूक नागरिक घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis