
लातूर, 12 जून (हिं.स.)। लातूर शहरातील मिनी मार्केट परिसरात पेट्रोल पंपाशेजारी एका दुचाकीला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीला आग लागल्यानंतर आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्रणेकडून सलग तीन अग्निशामक सिलेंडरचा वापर करण्यात आला. मात्र, आग तात्काळ नियंत्रणात येत नसल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
अखेर अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही घटना पेट्रोल पंपाच्या अगदी शेजारी घडल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, वेळेवर करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे संभाव्य अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नसून, दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis