
ठाणे, 12 जून (हिं.स.)। केंद्र शासनाच्या दिनांक 16 जून 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार देशभरात 'जनगणना २०२७' चे महाकाय राष्ट्रीय कार्य दोन टप्प्यांत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक १६ मे २०२६ ते दिनांक १४ जून २०२६ या कालावधीत जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत 'घर यादी व घरगणना' (House Listing & Housing Census) चे काम सुरू करण्यात आले आहे. हा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर, मोहिमेचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजेच प्रत्यक्ष 'लोकसंख्या गणना' पुढील वर्षी दिनांक ०१ फेब्रुवारी २०२७ ते दिनांक २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे.
प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी, ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात एकूण ०९ चार्ज कार्यरत करण्यात आले आहेत. या प्रशासकीय रचनेमध्ये ग्रामीण स्तरावरील तहसीलदार स्तरावर भिवंडी, कल्याण, शहापूर, मुरबाड व अंबरनाथ हे ०५ चार्ज समाविष्ट असून शहरी स्तरावर कुळगाव-बदलापूर नगर परिषद, अंबरनाथ नगर परिषद, मुरबाड नगर पंचायत व शहापूर नगर पंचायत अशा ०४ चार्जचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व भागांत अचूक नोंदी घेण्यासाठी आणि राष्ट्रीय मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे.
या पहिल्या टप्प्यांतर्गत शासनामार्फत नागरिकांना दिनांक ०१ मे २०२६ ते दिनांक १५ मे २०२६ या कालावधीत स्वतःहून आपली माहिती नोंदवण्याची 'स्व-गणना' (Self-Enumeration) डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या आधुनिक सुविधेला ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून, जिल्ह्यातील एकूण १ लाख १६ हजार ५१२ नागरिकांनी या स्व-गणनेच्या सुविधेचा यशस्वी लाभ घेतला आहे.
क्षेत्रीय पातळीवर काम करण्यासाठी जिल्ह्यातील या सर्व ०९ चार्जमध्ये एकूण ३ हजार ९२२ 'हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स' (HLBs) निश्चित करण्यात आले आहेत. जनगणनेच्या कार्याचा वेग आणि अचूकता राखण्यासाठी एकूण ४ हजार ८१६ जनगणना कर्मचाऱ्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आणीबाणीच्या प्रसंगासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या १० टक्के मनुष्यबळासह एकूण ४ हजार १२५ प्रगणक (Enumerators) आणि ६९१ पर्यवेक्षक (Supervisors) प्रत्यक्ष मैदानावर कार्यरत आहेत.
चार्जनिहाय विस्तृत आकडेवारीचा विचार केल्यास, भिवंडी ग्रामीण भागात सर्वाधिक म्हणजेच ९३२ हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स असून तिथे सर्वाधिक १ हजार ०९४ कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ कुळगाव-बदलापूर नगर परिषद क्षेत्रात ७०२ ब्लॉक्ससाठी ९०० कर्मचारी आणि अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रात ६९८ ब्लॉक्ससाठी ८४४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शहापूर ग्रामीण भागात ५८६ ब्लॉक्ससाठी ७१४ कर्मचारी, कल्याण ग्रामीण भागात ४१३ ब्लॉक्ससाठी ५१५ कर्मचारी, मुरबाड ग्रामीण भागात २८२ ब्लॉक्ससाठी ३६० कर्मचारी आणि अंबरनाथ ग्रामीण भागात २२८ ब्लॉक्ससाठी २८३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरी भागातील नगर पंचायतींचा विचार केल्यास, शहापूर नगर पंचायत क्षेत्रात ४३ ब्लॉक्ससाठी ५६ कर्मचारी आणि सर्वात कमी मनुष्यबळ मुरबाड नगर पंचायत क्षेत्रात असून तिथे ३८ ब्लॉक्ससाठी ५० कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना आपल्या दारी येणाऱ्या प्रगणकांना अचूक व योग्य माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात आपले संपूर्ण सहकार्य देण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर