
छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत पार पडली. मात्र, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले.
बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026, बूथनिहाय संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार, जनसंपर्क अभियान तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक गाव, प्रत्येक बूथ आणि प्रत्येक शिवसैनिक अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख रणजित पाटील तसेच महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शामलताई वडले यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर देण्यात आला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी अधिक मजबूत करण्यासाठी विविध सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अनुपस्थितीमुळे मात्र बैठकीनंतर राजकीय चर्चांना वेग आला.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis