
बीड, 13 जून (हिं.स.)। जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडली असून, परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मापुरी येथे एका घरावर छापा टाकून सुमारे ९ लाख ७७ हजार ३२० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. करण्यात आलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी २० किलो ३४० ग्रॅम वजनाचा गांजा आणि विक्रीसाठी वापरण्यात येणारा एक इलेक्ट्रिक वजनकाटा जप्त केला. या प्रकरणी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, धर्मापुरी येथील बाबूलाल उर्फ बबलू अतार हा आपल्या राहत्या घरातून गांजाची बेकायदेशीर विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने धर्मापुरी येथील संशयिताच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात घरात लपवून ठेवलेला साडे नऊ लाखांपेक्षा जास्त किमतीचा गांजा मिळून आला. पोलिसांनी या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या संयुक्त मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि धनराज जारवाल, परळी ग्रामीणचे सपोनि मेंडके, महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी श्रीमती पल्लेवाड मॅडम आणि तलाठी श्री. यासेर शेख यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis