
बीड, 13 जून (हिं.स.) : धारूर तालुक्यातील पहाडी दहिफळ येथे एका व्यक्तीचा अज्ञात कारणावरून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातील एका किराणा दुकानात संबंधित व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे, पोलीस उपनिरीक्षक गिराम तसेच पोलीस कॉन्स्टेबल कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू केला.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगत मृतदेह पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठविला.
खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून धारूर पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि गुन्ह्याची दिशा स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला असून गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून संशयितांचा शोध सुरू आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis