
लातूर, 12 जून (हिं.स.) : अहमदपूर तालुक्यातील मौजे लांजी शिवारात हात बांधून आणि गळा आवळून करण्यात आलेल्या अत्यंत क्रूर खून प्रकरणातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. मयत व्यक्तीचे नाव गोविंद सदाशिव फताटे (वय 50, रा. नावंदी, ता. उदगीर) असे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद फताटे हे मिस्त्री कामाच्या ठिकाणी मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. या धक्कादायक घटनेमुळे उदगीर आणि अहमदपूर परिसरात खळबळ उडाली आहे.आज सकाळी लांजी येथील शेतकरी प्रताप दादाराव मुंडे यांच्या शेतात मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे हात टॉवेलने बांधलेले होते आणि गळ्यावर पांढऱ्या रंगाच्या गमजाने गळा आवळून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलीस पाटील राजकुमार दराडे यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात तळ ठोकून तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.
तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव, पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुधाकर बावकर यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.या प्रकरणाच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांनी घटनास्थळाची तपासणी केली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध वेगाने सुरू असून, लवकरच गुन्हेगारांना अटक केली जाईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis