
पुणे, 14 जून (हिं.स.)। वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, गुंजवणी, वीर, देवघर आणि भाटघर या आठ प्रमुख धरणांच्या सुरक्षिततेचा सर्वंकष आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय जल आणि वीज संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) येत्या वर्षभरात या धरणांचे तांत्रिक मूल्यांकन करून त्यांचा सविस्तर अहवाल जलसंपदा विभाग आणि राज्य सरकारकडे सादर करणार आहे.या मूल्यांकनात धरण उभारण्यापूर्वीच्या सर्वेक्षणापासून ते आजपर्यंतच्या सर्व माहितीचा अभ्यास करण्यात येणार आहे.
धरणांची भौगोलिक परिस्थिती, रचना, उद्देश आणि सध्याची स्थिती यांची तुलनात्मक पडताळणी केली जाईल. तसेच धरणांची संरचनात्मक सुरक्षितता, जलसाठा आणि गाळाची स्थिती, भूकंपविषयक निकष, पाया (फाउंडेशन) तसेच हवामान बदलाचा परिणाम यांचाही सखोल अभ्यास केला जाणार आहे.अभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारे आवश्यक उपाययोजना सुचवून धरणांचे आयुर्मान वाढविणे आणि भविष्यातील संभाव्य धोके कमी करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून, त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात खडकवासला आणि पुणे पाटबंधारे विभागातील आठ धरणांचे स्थापत्य लेखापरीक्षण व सर्वंकष मूल्यांकन केले जाणार आहे. यासाठी विशेष तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.या उपक्रमामुळे पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांच्या दीर्घकालीन सुरक्षिततेबाबत स्पष्ट चित्र समोर येण्यास मदत होणार असून, जलसंपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठीही हा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु