दुचाकीची उभ्या वाहनास धडक; हेल्मेट अभावी २५ वर्षीय युवकाचा मृत्यू
लातूर, 15 जून (हिं.स.)। लातूर शहरातील इंडियानगर परिसरात दुचाकीवरील नियंत्रण सुटून उभ्या असलेल्या वाहनास धडक दिल्याने एका २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला
हेल्मेट


लातूर, 15 जून (हिं.स.)।

लातूर शहरातील इंडियानगर परिसरात दुचाकीवरील नियंत्रण सुटून उभ्या असलेल्या वाहनास धडक दिल्याने एका २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असून, त्याने हेल्मेट परिधान केले असते तर त्याचा निश्चितपणे जीव वाचला असता.

आदित्य बाळासाहेब खरे (वय २५ वर्षे, रा. दत्तनगर, लातूर) हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून इंडियानगर परिसरातून जात असताना अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या कारवर जोरात आदळली. या अपघातात आदित्य याच्या डोक्याला, चेहऱ्यासह हात-पायांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

प्राथमिक तपासात अपघातावेळी मयत युवकाने हेल्मेट परिधान केले नसल्याचे समोर आले आहे. रस्ते अपघातांमध्ये डोक्याला होणारी दुखापत ही मृत्यूचे प्रमुख कारण ठरत असून, हेल्मेट हा दुचाकीस्वाराचा सर्वात महत्त्वाचा सुरक्षाकवच आहे. या घटनेतही डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे युवकाचा जीव गेला असून, हेल्मेटचा वापर केला असता तर गंभीर इजा टाळता आली असती, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

लातूर पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर अनिवार्यपणे करावा. वाहतूक नियमांचे पालन करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे आणि सुरक्षिततेची काळजी घेणे ही प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी आहे. क्षणिक निष्काळजीपणा कुटुंबासाठी कायमचे दुःख निर्माण करू शकतो.

हेल्मेट हा दंड टाळण्यासाठी नव्हे, तर जीव वाचविण्यासाठी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande