
सोलापूर, 14 जून (हिं.स.)।
खरीप हंगाम २०२६ साठी राज्य शासनाच्या विविध योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर बियाणे संच (सीड किट) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान’ अंतर्गत तूर, मूग आणि उडीद या पिकांच्या सुधारित वाणांचे प्रत्येकी ४ किलो वजनाचे बियाणे तसेच जैविक खताची पाकिटे शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीतील नवीन वाणांना या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी’च्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे.
यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्याने या योजनेत महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देण्यात आले असून किमान ३० टक्के लाभ महिला लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन आहे.
योजनेसंदर्भातील अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड