
सोलापूर, 14 जून (हिं.स.)।
शहरातील पंचकट्टा परिसरातील मुल्ला बाबा टेकडी भागात तब्बल २४ वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन वादाला अखेर पूर्णविराम मिळाला. दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी संबंधित जागेवरील अतिक्रमणे हटवून ती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या ताब्यात देण्याची कारवाई करण्यात आली.
न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना दोन जेसीबीच्या सहाय्याने पत्र्याची पाच दुकाने आणि चार घरे हटविण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ५० हून अधिक पोलिस कर्मचारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मुल्ला बाबा टेकडी परिसरातील या जागेबाबत श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी आणि हाजी हसनसाहेब वस्ताद (मयत) यांच्या वारसांसह अन्य संबंधितांमध्ये सन २००२ पासून न्यायालयीन वाद सुरू होता. दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने देवस्थानच्या बाजूने निकाल देत संबंधित जागा ताब्यात देण्याचे आदेश दिले.
न्यायालयीन नोंदीनुसार, सिटी सर्व्हे क्रमांक ६०५४ (गड्डा प्लॉट) मधील ही जागा पूर्वी कडबागाड्या विक्रीसाठी वापरली जात होती. न्यायालयाने विविध मोजमापांच्या जागेवरील पत्र्याचे शेड हटवून जागा देवस्थानच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चार बेलिफ यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कारवाई पार पडली.
कारवाईदरम्यान काही रहिवाशांनी आक्षेप नोंदविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत संपूर्ण मोहीम शांततेत पूर्ण केली. सकाळपासून सुरू असलेल्या या कारवाईत दुकाने, शेड आणि काही निवासी बांधकामे हटविण्यात आली.
न्यायालयीन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने शहरात या कारवाईची मोठी चर्चा सुरू असून, देवस्थानच्या मालकीची जागा अतिक्रमणमुक्त झाल्याचे मानले जात आहे. तसेच शहरातील इतर वादग्रस्त अतिक्रमणांबाबतही अशा प्रकारच्या कारवायांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड