
सोलापूर, 14 जून (हिं.स.)।
पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. मुदतीत ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात.
केंद्र शासनाकडून पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत व पारदर्शक ठेवण्यासाठी शासनाने वार्षिक ई-केवायसी सक्तीची केली आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नसल्याने कृषी विभागाने विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी शेतकरी मेळावे आयोजित करून ई-केवायसीचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी ३० जूनपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. अन्यथा पुढील हप्ते संबंधितांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड