
सोलापूर, 14 जून (हिं.स.)।
प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक सुखकर आणि समाधानकारक करण्यासाठी तसेच विमानतळावरील प्रवासी-अनुकूल सुविधांविषयी जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस 2026’ साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने सोलापूर विमानतळावर आगमन व प्रस्थान करणाऱ्या प्रवाशांचे तिलक लावून आणि मिठाई वाटप करून स्वागत करण्यात येणार आहे. तसेच दिवसभर नियमित अंतराने ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात येणार असून विविध सांस्कृतिक व लोककला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यवाहक विमानतळ संचालक अंजनी कुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उत्सवात वृक्षारोपण मोहीम, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भेटींचा समावेश आहे. या भेटींमधून विद्यार्थ्यांना विमान वाहतूक क्षेत्र आणि विमानतळ संचालनाची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.
विमानतळावरील सेवा अधिक प्रभावीपणे बजावणाऱ्या हाऊसकीपिंग कर्मचारी, एअरलाईन कर्मचारी, राज्य पोलीस कर्मचारी तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचारी आणि भागधारकांचा गौरवही यावेळी केला जाणार आहे.
यशोधरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने प्रवासी, विमानतळ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच स्थानिक रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे.
याशिवाय सेल्फी पॉईंट, प्रवासी संवाद व अभिप्राय सत्र, विमानतळावरील सुविधा व सेवांविषयी जनजागृती मोहीम आणि विविध सुविधांची माहिती देणारे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
प्रवासी सुविधा दिवस हा सोलापूर विमानतळाच्या प्रवासी समाधान, सामुदायिक सहभाग, पर्यावरण संवर्धन आणि सेवा उत्कृष्टतेप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड