
सोलापूर, 14 जून (हिं.स.)।
दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेने लोकसहभागाच्या बळावर आदर्श परिवर्तनाचा नवा नमुना उभा केला आहे. ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे शाळेचे रूपडे पूर्णपणे बदलले असून आकर्षक रंगसंगती, शैक्षणिक चित्रांनी सजलेल्या बोलक्या भिंती आणि आधुनिक डिजिटल सुविधांमुळे ही शाळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच रंगीबेरंगी सजावट आणि सुशोभित परिसर पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतो. शाळेच्या भिंतींवर प्रतापगड, भारतीय संविधान, भारत व महाराष्ट्राचे नकाशे, राष्ट्रीय प्रतीके, वन्यजीव, पक्षी, फुलपाखरे, समुद्री जीवसृष्टी, संगीत वाद्ये तसेच विविध शैक्षणिक व सांस्कृतिक विषयांवरील चित्रे रेखाटण्यात आली आहेत. थ्री-डी शैलीतील रंगकामामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याचा अनुभव अधिक रंजक आणि आनंददायी होत आहे.वर्गखोल्यांना ऐतिहासिक किल्ल्यांची नावे देण्यात आली असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची आवड वाढीस लागली आहे. शाळेतील प्रत्येक भिंत ही जणू अभ्यासक्रमाचा भाग बनली असून शिक्षणासोबत संस्कार आणि प्रेरणा देण्याचे कार्य करत आहे.या परिवर्तनामागे लोकसहभागाची मोठी ताकद आहे. सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी शाळेला भेट दिल्यानंतर लोकसहभागातून शाळा समृद्ध करण्याचा संकल्प केला होता. त्यांच्या पुढाकारातून पुण्यातील एका कंपनीच्या सीएसआर निधीतून सुमारे साडेआठ लाख रुपयांची मदत मिळाली. या निधीतून प्रत्येक वर्गासाठी एलईडी टीव्ही, स्मार्ट बोर्ड, संगणक, टेबल-खुर्च्या, साऊंड सिस्टीम आणि अन्य आधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.स्थानिक उद्योजकांनीही शाळेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उद्योजक किशोर माळी यांनी १ लाख ५१ हजार रुपयांची मदत केली, तर शिवानंद हत्तुरे यांनी १ लाख रुपयांचे योगदान दिले. याशिवाय ग्रामस्थ, पालक आणि दानशूर व्यक्तींनी विविध स्वरूपात सहकार्य करून शाळेला नवे रूप दिले.सुशोभित बगीचा, स्वच्छ परिसर, शैक्षणिक चित्रांनी सजलेल्या भिंती आणि डिजिटल सुविधांनी युक्त वर्गखोल्या यामुळे इंगळगीची जिल्हा परिषद शाळा ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील आदर्श मॉडेल म्हणून पुढे येत आहे. लोकसहभागातून घडलेल्या या परिवर्तनामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह वाढला असून सरकारी शाळाही खासगी शाळांच्या तोडीस तोड उभ्या राहू शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड