
अमरावती, 14 जून (हिं.स.) यंदा मॉन्सूनचे आगमन विलंबाने होणार असल्याने पेरण्यांचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता अधिक आहे. जिल्ह्यात अद्याप पाऊसच झाला नसल्याने पेरण्यांना प्रारंभ होऊ शकलेला नाही. सोयाबीन पेरणीचा काळ कोरडा जाऊ लागला आहे. यंदा वार्षिक सरासरीच्या ९० टक्के पाऊस होण्याची व तीसुद्धा खंडित स्वरूपाची राहणार असल्याने शेतीवरील संकट गडद होऊ लागले आहे. दरम्यान १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
विदर्भात मॉन्सूनचे आगमन साधारणपणे १५ ते २५ जूनदरम्यान होते. सध्या मॉन्सूनची वाटचाल मंदावली असल्याने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे आणि मॉन्सूनसाठी हवामान खात्याच्या अंदाजानुसार २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. विदर्भातील अधिकांश क्षेत्र कोरडवाहू असून पावसाच्या भरोशावर या भागातील शेती अवलंबली आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका ही या भागातील मुख्य पिके असून सोयाबीनच्या पेरणीचा काळ सुरू झाला असला तरी पावसाचे आगमन न झाल्याने मशागत झालेली शेती प्रतीक्षेतच आहे. बियाणे बाजार थंड आहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन बिघडू लागले असून त्याचा एकूणच परिणाम उत्पादनाच्या सरासरीवर होणार असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्रही बिघडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार व विदर्भाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार यंदा पावसाचे वितरण दोन भागांत विभागले जाण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण सामान्य राहण्याचा अंदाज आहे. तर पश्चिम विदर्भातील अमरावतीसह पाच जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यंदाचा मृग गेला कोरडा
एक जूनपासून प्रारंभ झालेल्या पावसाळ्यात गेल्या बारा दिवसांत जिल्ह्यात १४.३ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत तो २४.५ टक्के आहे. या कालावधीत ५८.३ मिमी पाऊस अपेक्षित असून ७५.५ टक्क्यांची तूट आहे. सात जूनपासून प्रारंभ झालेल्या मृगनक्षत्राच्या पहिल्या दोन दिवसांत थोडा पाऊस झाला, त्यानंतर मात्र नक्षत्र कोरडे जाऊ लागल्याने चिंता वाढू लागली आहे.
अमरावतीमधील पावसाचा अंदाज
१३ ते १५ जूनः मुख्यत्वे आकाश अंशतः ढगाळ राहील आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. कमाल तापमान ३७ अंश ते ३८ अंशाच्या आसपास राहील. १८ जून नंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, १९ आणि २० जून रोजी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा (६५ टक्के शक्यता) अंदाज वर्तविण्यात आला आहे.
वर्षनिहाय मॉन्सूनचे आगमन
वर्ष २०२३ः २३ ते २५ जून
वर्ष २०२४ः २० ते २२ जून
वर्ष २०२५ः १० जूनपूर्वी ( २५ मे, गेल्या ३५ वर्षात सर्वांत लवकर आगमन)
वर्ष २०२६ अंदाजः २० जून
------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी