
सोलापूर, 14 जून (हिं.स.)।
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना चालना दिली आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी वसंतराव देशमुख यांना भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मैदानात उतरवून राजकीय समीकरणे बदलली आहेत.
या निवडणुकीचे नेतृत्व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील करत असल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा मोहिते-पाटील विरुद्ध आजी-माजी आमदार असा राजकीय सामना रंगला आहे. भाजपकडे स्पष्ट संख्याबळ असतानाही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून राजकीय वर्तुळाचे लक्ष तिच्याकडे लागले आहे.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येऊन भाजपला कडवे आव्हान देतील, अशी सुरुवातीची चर्चा होती. मात्र, काही प्रमुख नेत्यांनी भाजपला सहकार्याचे संकेत दिल्याने मोहिते-पाटील यांच्या राजकीय रणनीतीला धक्का बसल्याचे दिसून आले. आमदार बाबासाहेब देशमुख, उत्तमराव जानकर, नारायण पाटील आणि अभिजित पाटील यांच्यासह काही स्थानिक नेत्यांची भूमिका भाजपसाठी अनुकूल असल्याची चर्चा रंगली आहे.
तरीही मोहिते-पाटील यांच्या अनपेक्षित राजकीय खेळींमुळे ही निवडणूक एकतर्फी राहिलेली नाही. भाजपने आपली संघटनात्मक ताकद आणि स्थानिक संपर्क यंत्रणा सक्रिय केली असून, दुसरीकडे मोहिते-पाटील यांनीही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू ठेवली आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अनेक अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड