महावितरणच्या हलगर्जीपणाचा फटका; कोथरूडमध्ये पाणीपुरवठा बंद
पुणे, 14 जून (हिं.स.)। शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असताना विविध प्रशासकीय विभागांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कोथरूड परिसरातील डुक्कर खिंड येथील इताशा सोसायटीजवळ महावितरण विभागा
mahavtran


पुणे, 14 जून (हिं.स.)।

शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असताना विविध प्रशासकीय विभागांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कोथरूड परिसरातील डुक्कर खिंड येथील इताशा सोसायटीजवळ महावितरण विभागाच्या खोदकामादरम्यान जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले.

शनिवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास ही घटना घडली. जलवाहिनी फुटल्यामुळे वेदभवन, स्वामी विवेकानंद कॉलनी आणि परिसरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा तातडीने बंद करावा लागला. अचानक पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

महावितरण विभागाच्या खोदकामामुळे जलवाहिनीचे नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जलवाहिनी दुरुस्तीसाठी काही तासांचा कालावधी लागणार असल्याने संबंधित भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

आधीच वाढत्या उष्णतेमुळे आणि पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. पाणी वाचविण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात असताना विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande