पुण्यात होणार १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
* इतिहासात पुण्यात होणारे हे १४ वे संमेलन पुणे, 15 जून (हिं.स.)। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात येणार
University Pune SPUU


* इतिहासात पुण्यात होणारे हे १४ वे संमेलन

पुणे, 15 जून (हिं.स.)।

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे. चार दिवस चालणारे हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात पुण्यात होणारे हे १४ वे संमेलन असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात प्रथमच साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलनाचे स्थळ आणि तारखा निश्चित करण्यात आल्या.पत्रकार परिषदेला साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर तसेच ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे आयोजन करणाऱ्या समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे उपस्थित होते.

संमेलनाच्या नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संमेलनासाठी आवश्यक असलेले विशाल प्रांगण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था आणि विद्यापीठातील सुमारे दीड हजार प्राध्यापक व कर्मचारी संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करतील, अशी ग्वाही कुलगुरू सुरेश गोसावी यांनी दिली.

संमेलनातील प्रमुख कार्यक्रम विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे प्रांगण, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा परिसरात कविकट्टा, कथाकथन आणि विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.शहरातील वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांवरील ताण कमी ठेवत सुयोग्य नियोजनातून हे शताब्दी साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा प्रयत्न असल्याचे योगेश सोमण यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande