बेलोरा विमानतळावर नाईट लॅण्डिंगसाठी तांत्रिक तयारी पूर्ण; अंतिम परवानगीची प्रतीक्षा
DVOR यंत्रणा व धावपट्टी प्रकाशयोजना कार्यान्वित रात्रीच्या विमानसेवेमुळे दिलासा मिळण्याची शक्यता अमरावती, 15 जून (हिं.स.) : अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर रात्रीच्या विमानसेवेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक सुविधांची उभारणी पूर्ण झाली असून, त्यांच
बेलोरा विमानतळावर नाईट लॅण्डिंगची प्रतीक्षा; डीव्हीओआर व धावपट्टी लाईट्सचे काम पूर्ण


DVOR यंत्रणा व धावपट्टी प्रकाशयोजना कार्यान्वित

रात्रीच्या विमानसेवेमुळे दिलासा मिळण्याची शक्यता

अमरावती, 15 जून (हिं.स.) : अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर रात्रीच्या विमानसेवेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक सुविधांची उभारणी पूर्ण झाली असून, त्यांची यशस्वी चाचणीदेखील पार पडली आहे. डॉपलर व्हीएचएफ ओम्नीडायरेक्शनल रेंज (DVOR) यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून धावपट्टीवरील प्रकाशयोजनाही सज्ज झाली आहे. त्यामुळे विमानांच्या सुरक्षित उड्डाण आणि अवतरणासाठी आवश्यक असलेली प्रमुख तांत्रिक व्यवस्था उपलब्ध झाली आहे.

विमानतळावरील नव्या सुविधांची डीजीसीएच्या तांत्रिक पथकाने आणि अभियंत्यांनी पडताळणी केली आहे. मात्र, नाईट लॅण्डिंग आणि रात्रीच्या विमानसेवेसाठी आवश्यक असलेली अंतिम प्रशासकीय परवानगी अद्याप प्राप्त झालेली नसल्याने सेवा सुरू होण्याबाबतची अनिश्चितता कायम आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून आवश्यक कागदपत्रे आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक चाचण्यांदरम्यान रात्री विमानाचे सुरक्षित उड्डाण आणि अवतरण यशस्वीरीत्या पार पडल्याने लवकरच बेलोरा विमानतळावरून दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा विमानसेवा उपलब्ध होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

अमरावतीमध्ये विकसित होत असलेल्या पीएम मित्रा टेक्सटाइल पार्कसह विविध औद्योगिक प्रकल्पांमुळे शहरात उद्योजक, अधिकारी आणि गुंतवणूकदारांची वर्दळ वाढत आहे. सध्या रात्रीच्या हवाई प्रवासासाठी नागपूर विमानतळाचा पर्याय वापरावा लागतो. बेलोरातून थेट रात्रीची विमानसेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ, खर्च आणि प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच मुंबईसह इतर प्रमुख शहरांकडे ऐनवेळी प्रवास करणेही अधिक सोयीचे ठरणार आहे.

दरम्यान, बेलोरा विमानतळावरून रात्रीच्या विमानसेवेला मंजुरी मिळावी यासाठी एअर इंडियाकडून डीजीसीएकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी नाईट लॅण्डिंग सेवा सुरू होण्याची निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. याबाबत महाराष्ट्र विमानतळ प्राधीकरणाचे गौरव उपश्यम म्हणाले की, परवानगीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. बेलोरा विमानतळावरील नाईट लॅण्डिंग सुविधेला मंजुरी मिळाल्यास अमरावतीच्या हवाई संपर्कात मोठी भर पडणार असून औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande