
पुणे, 15 जून (हिं.स.)।
माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे छोटा हत्ती विहिरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेदरम्यान इरफान मुजावर या तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे चार जणांचे प्राण वाचले. प्रसंगावधान राखून जीवाची पर्वा न करता केलेल्या या बचावकार्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
घटनेच्या वेळी इरफान मुजावर विहिरीजवळच होता. त्याने छोटा हत्ती वाहन हेलकावे खात थेट विहिरीत कोसळताना प्रत्यक्ष पाहिले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्याने तात्काळ गावातील नागरिकांना फोन करून घटनास्थळी लवकर पोहोचण्याचा निरोप दिला.
मदत येण्याची वाट न पाहता इरफानने कोणताही विलंब न करता विहिरीत उडी घेतली. सर्वप्रथम त्याने दोन वर्षांच्या आरव या चिमुकल्याला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर आणखी तिघांना पाण्यातून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.
मात्र, या भीषण दुर्घटनेत इतर काही भाविकांना जीव गमवावा लागला. अपघाताचे वर्णन करताना इरफान म्हणाला, “मी रस्त्याच्या बाजूने जात होतो. छोटा हत्ती माझ्या पुढे जात होता. अचानक वाहनाने एक-दोन हेलकावे घेतले आणि थेट विहिरीत कोसळले.”
इरफान मुजावर याने दाखवलेले धाडस आणि मानवतेचे दर्शन परिसरात चर्चेचा विषय ठरले असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड