
लातूर, 15 जून (हिं.स.) लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातमुक्त आणि सुरक्षित वाहतुकीसाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून विविध जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी कमी करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक रक्तदात्यास सुरक्षित वाहन चालविण्याचा संदेश देण्यासाठी हेल्मेट भेट देण्यात आले आहे.
या उपक्रमाला नागरिक, पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, लातूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये आतापर्यंत तीन हजारांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. रक्तदानासोबतच हेल्मेट वापराबाबत जनजागृती करून अपघात प्रतिबंधासाठी व्यापक प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, रस्ते अपघातांच्या कारणांचा अभ्यास करता दारूच्या नशेत वाहन चालविणारे चालक मोठ्या प्रमाणात अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रण शाखेसह सर्व पोलीस ठाण्यांना मद्यधुंद वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने दि. ०७ जून २०२६ ते दि. १३ जून २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. अशी माहिती आज देण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी वाहन तपासणी नाकेबंदी करून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तब्बल ७३ चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. लातूर पोलीस दलाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी या दोन्ही माध्यमांतून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये तसेच हेल्मेट व सीटबेल्टचा नियमित वापर करावा, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे. स्वतःचा जीव वाचवा, इतरांचाही जीव धोक्यात घालू नका; दारू पिऊन वाहन चालविणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणे होय.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis