
नवी दिल्ली, 02 जून (हिं.स.) : तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी आज, मंगळवारी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या अन्नामलाई यांनी भाजपाध्यक्ष नितीन नवीन यांना 5 पानी राजीनामा सोपवल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.
माजी आयपीएस अधिकारी असलेल्या अन्नामलाई यांनी 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2021 ते 2025 या काळात त्यांनी तमिळनाडू भाजपचे नेतृत्व केले. या काळात त्यांनी व्यापक जनसंपर्क मोहिमा राबवून राज्यात पक्षाला बळकटी दिली तसेच युवा मतदार आणि सोशल मीडियावर मोठा प्रभाव निर्माण केला. परंतु, 2026 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अन्नामलाई आणि भाजपमध्ये मतभेद निर्णाण झाले. अन्नामलाई यांना सोमवारी त्यांच्या पुढील राजकीय पावलांबाबत विचारले असता त्यांनी “कृपया थांबा, आम्ही दोन दिवसांत बसून चर्चा करू,” असे सांगितले होते. अन्नामलाई यांचा 4 जून रोजी वाढदिवस असून त्यापूर्वी चेन्नईच्या प्रमुख रस्त्यांवर आणि गल्लीबोळात “आमचे नेते, या आणि आमचे नेतृत्व करा” अशा घोषणा लिहीलेले पोस्टर्स दिसत आहेत.
यापार्श्वभूमीवर अन्नामलाई यांनी आज, मंगळवारी दिल्लीत जाऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांना राजीनामा सोपवला. मिळालेल्या माहितीनुसार, माजी आयपीएस अधिकारी अन्नामलाई हे एका नवीन प्रादेशिक राजकीय पक्षाची स्थापना करण्याच्या विचारात आहेत; त्यांच्या सहकाऱ्यांनी या पक्षाचे वर्णन धर्मनिरपेक्ष आणि तामिळ-हितैषी विचारसरणी असलेला पक्ष असे केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही प्रस्तावित संघटना येत्या सहा ते आठ महिन्यांत सुरू केली जाण्याची शक्यता आहे; तामिळनाडूमध्ये भाजप आणि द्रविड पक्ष या दोघांनाही एक सक्षम पर्याय म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचा या संघटनेचा उद्देश आहे.
अन्नामलाई यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत अशी 'तामिळ अस्मिता' जपणारे एक राजकीय व्यासपीठ निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय आहे; तसेच, प्रतिस्पर्धी पक्षांना विरोध करताना त्यांनी आपली भूमिका केवळ 'मुद्द्यांवर आधारित' ठेवण्याचा निर्धार केला आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी