
नवी दिल्ली, 02 जून (हिं.स.) : तमिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी पक्ष सोडून नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन आणि पक्षाचे महासचिव बी. एल. संतोष यांची नवी दिल्लीत भेट घेतली.
ही भेट अशा वेळी झाली आहे जेव्हा अन्नामलाई भाजप सोडण्याची आणि स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची योजना आखत असल्याच्या शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. मागील काही महिन्यांपासून अन्नामलाई आणि पक्ष नेतृत्वामध्ये मोठे मतभेद असल्याची चर्चा आहे. अन्नामलाई यांना सोमवारी त्यांच्या पुढील राजकीय पावलांबाबत विचारले असता त्यांनी “कृपया थांबा, आम्ही दोन दिवसांत बसून चर्चा करू,” असे सांगितले होते. अन्नामलाई यांचा 4 जून रोजी वाढदिवस असून त्यापूर्वी चेन्नईच्या प्रमुख रस्त्यांवर आणि गल्लीबोळात “आमचे नेते, या आणि आमचे नेतृत्व करा” अशा घोषणा लिहीलेले पोस्टर्स दिसत आहेत.
माजी आयपीएस अधिकारी असलेल्या अन्नामलाई यांनी 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2021 ते 2025 या काळात त्यांनी तमिळनाडू भाजपचे नेतृत्व केले. या काळात त्यांनी व्यापक जनसंपर्क मोहिमा राबवून राज्यात पक्षाला बळकटी दिली तसेच युवा मतदार आणि सोशल मीडियावर मोठा प्रभाव निर्माण केला. परंतु, 2026 च्या विधानसभा निवडणुकांनंतर त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडी तमिळनाडूच्या राजकीय पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या मानल्या जात असून राज्यातील आगामी राजकारणावर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी