
तिरुमला, 02 जून (हिं.स.) : आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमाला तिरुपती देवस्थान (टीटीडी) मंदिरात भगवान वेंकटेश्वराला केस अर्पण करणाऱ्या भक्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. टीटीडीच्या माहितीनुसार, 1 ते 27 मे या कालावधीत तब्बल 12,43,063 भाविकांनी आपले केस अर्पण केले आहेत. हा आकडा मागील वर्षांच्या तुलनेत नवा विक्रम ठरला आहे.मे 2024 मध्ये ही संख्या सुमारे 10.65 लाख होती, तर त्यापूर्वीच्या कालावधीत सुमारे 10.18 लाख भक्तांनी मुंडन केले होते.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या, विकेंडची गर्दी आणि देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांमुळे ही वाढ झाल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे. यावर्षी 18 ते 23 मे दरम्यान दररोज 50 हजारांहून अधिक भक्तांनी मुंडन केले. विशेषतः 23 मे रोजी 57,580 भाविकांनी केस अर्पण करून एकाच दिवसाचा विक्रम नोंदवला आहे. मंदिरातील गर्दी नियंत्रणासाठी टीटीडीने मुख्य कल्याणकट्टा तसेच 11 मिनी मुंडन केंद्रांवर 24 तास सेवा सुरू ठेवली आहे. तसेच 1150 पेक्षा अधिक न्हावी (त्यात 269 महिला न्हावी) शिफ्टमध्ये कार्यरत आहेत, जेणेकरून भाविकांना लांब प्रतीक्षा करावी लागू नये.धार्मिक श्रद्धेबरोबरच हे केस टीटीडीसाठी मोठ्या उत्पन्नाचा स्रोत बनले आहेत. यांना “काळं सोनं” असेही म्हटले जाते. जमा केलेले केस स्वच्छता व ग्रेडिंगनंतर चीन, इटली, अमेरिका आणि ब्राझील यांसारख्या देशांमध्ये लिलावाद्वारे विकले जातात, जिथे त्यांचा वापर विग, हेअर एक्स्टेंशन आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये होतो.
आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये केस लिलावातून 67 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, जे 2023-24 मध्ये वाढून 167 कोटी रुपये झाले. 2024-25 मध्ये हे उत्पन्न 190 कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे, तर पुढील आर्थिक वर्षात 200 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.टीटीडीने मुंडन केंद्रांवर स्वच्छता, निर्जंतुक ब्लेड, गरम पाणी, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि टोकन प्रणाली यांसारख्या सुविधा वाढवल्या आहेत, जेणेकरून भाविकांना सुरक्षित आणि आरामदायक अनुभव मिळू शकेल.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी