


द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याप्रती कटिबद्धतेचा केला पुनरुच्चार
नवी दिल्ली, 02 जून (हिं.स.)। भारतभेटीवर आलेले दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती शिपोकोसा पॉलस माशातिले यांनी नवी दिल्ली येथील उपराष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. माशातिले यांच्यासोबत दक्षिण आफ्रिकी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री तसेच अधिकारी यांचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळही होते.
दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सहकार्य, कौशल्यविकास आणि दोन्ही देशांतील जनतेचे परस्पर संबंध दृढ करण्यासह भारत-दक्षिण आफ्रिका द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करण्यावर फलदायी चर्चा केली. त्यांनी ग्लोबल साउथ देशांच्या प्राधान्यक्रमांना पुढे नेण्याबाबत तसेच ब्रिक्स, जी20, आयबीएसए आणि आयओआरए यांसारख्या बहुपक्षीय मंचांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत विचारांची देवाणघेवाण केली.
या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आर्थिक संबंधांच्या संपूर्ण क्षमतेचा वापर करून घेण्याच्या मार्गांबाबत चर्चा केली तसेच विविध व्यवसाय आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या गरजेवर अधिक भर दिला. या संदर्भात उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी प्रस्तावित भारत-दक्षिण आफ्रिकी सीमाशुल्क महासंघ (एसएसीयु) प्राधान्य व्यापार कराराचा ठळक उल्लेख केला आणि या संदर्भातील वाटाघाटी लवकर सुरु होऊन यशस्वीपणे संपन्न होतील अशी आशा व्यक्त केली.
दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी या दोन देशांच्या दरम्यान संरक्षण क्षेत्रातील वाढत्या सहकार्याचे स्वागत केले आणि भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या आयबीएसएएमएआर नौदल सरावाच्या आगामी सत्रांसह सहयोगात विस्तार होण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. चित्त्यांच्या हस्तांतरणाच्या माध्यमातून भारताच्या चित्ता पुनर्वसन कार्यक्रमाला मदत केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी दक्षिण आफ्रिकेचे आभार मानले. वन्य भागात झालेल्या चित्त्यांच्या यशस्वी प्रजननासह चित्ता प्रकल्पाची उत्साहवर्धक प्रगती लक्षात घेत त्यांनी या वैशिष्ट्यपूर्ण संवर्धन उपक्रमासाठी दक्षिण आफ्रिकेने सहकार्य करत राहावे अशी विनंती केली.
उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए), आपत्तीप्रती लवचिक पायाभूत सुविधांसाठीची आघाडी (सीडीआरआय), तसेच आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडी (आयबीसीए) या भारताच्या महत्वपूर्ण बहुपक्षीय उपक्रमांची सामायिक विकास आणि शाश्वतता विषयक लक्ष्यांप्रती अनुकुलता लक्षात घेत या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा विचार करण्याचे आमंत्रण देखील दिले.
या बैठकीने भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याप्रती तसेच शांतता, समृद्धी, शाश्वत विकास आणि जगाच्या दक्षिणेकडील देशांच्या हितांचे रक्षण करण्याप्रती सामायिक कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती माशातिले तसेच त्यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांना भारतातील फलदायी आणि आनंददायी वास्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule