
श्रीनगर, 02 जून (हिं.स.)। श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीच्या महत्त्वपूर्ण दुरुस्ती आणि देखभाल कामांसाठी १ ऑक्टोबरपासून १५ दिवस सर्व उड्डाणे बंद करण्यात येणार आहेत. या दोन आठवड्यांच्या बंदीमुळे जम्मू-काश्मीरच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण हा कालावधी दुर्गापूजेच्या गर्दीच्या सणासुदीच्या हंगामाशी थेट जुळून येत आहे. या काळात पश्चिम बंगालमधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक खोऱ्यात येत असतात. त्यामुळे ट्रॅव्हल ऑपरेटर्सना मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती वाटत आहे.
विमानतळ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पूर्ण बंदीपूर्वी टप्प्याटप्प्याने देखभाल कामे सुरू केली जाणार आहेत. जुलैपासून विमानतळाचे कामकाज दर आठवड्यात दोन दिवस बंद ठेवले जाईल. त्यानंतर १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण १५ दिवसांची बंदी लागू करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, उड्डाण संचालनाच्या सुरक्षिततेसाठी धावपट्टीची दुरुस्ती अत्यावश्यक आहे.
तसेच, भारतीय वायुसेनेने जारी केलेल्या ‘नोटिस टू एअरमेन’ नंतर ६ एप्रिलपासूनच उड्डाणांवरील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सुरू असलेल्या अभियांत्रिकी कामांमुळे विमानतळाच्या कामकाजाच्या वेळेत मोठी कपात करण्यात आली आहे. सध्या उड्डाणे केवळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेतच सुरू आहेत. यापूर्वी उड्डाणांचे संचालन सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत होत होते.
ऑक्टोबरमधील विमानतळ बंदीच्या पार्श्वभूमीवर आतिथ्य आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित हितधारकांनी प्रशासनाला या वेळापत्रकाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. वर्षातील सर्वाधिक वर्दळीच्या देशांतर्गत पर्यटन हंगामात हवाई संपर्क बंद राहिल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, अशी त्यांची भूमिका आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule