
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर, 20 जून (हिं.स.) : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराच्या जतन, संवर्धन आणि परिसर विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या १४४५.९७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याचा प्रारंभ आज शनिवारी करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकल्पाची औपचारिक मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, ॲड. आशिष शेलार, संजय सावकारे, मकरंद पाटील, माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. अमित शाह यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर रामाचा पार येथे उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले.मंदिर परिसरातील विविध विकासकामांच्या कोनशीलेचे अनावरण यावेळी करण्यात आले. तसेच नव्या प्रदक्षिणा मार्गासह मुख्य मंदिराचे जतन, संवर्धन आणि विकासकामांचे सादरीकरण जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी उपस्थितांना दिले.
राज्य मंत्रिमंडळाने ६ मे २०२५ रोजी या विकास आराखड्यास मंजुरी दिली होती. पहिल्या टप्प्यात १४३.९० कोटी रुपयांची कामे सुरू असून मंदिराचे जतन, दुरुस्ती, विद्युतीकरण, सीसीटीव्ही व्यवस्था आणि प्रकाशयोजनांवर भर दिला जात आहे.या आराखड्यांतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, माहिती केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह, मल्टिपर्पज हॉल, सुरक्षा व्यवस्था, प्रथमोपचार केंद्र, वाहनतळ, दुकाने, अँफिथिएटर तसेच विविध सोयी-सुविधांची उभारणी केली जाणार आहे. याशिवाय परिसरातील ४१ लहान-मोठ्या मंदिरांचे संवर्धन आणि नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरणही करण्यात येणार आहे.
कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर हे भारतातील प्राचीन, जागृत आणि प्रमुख शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. सुमारे हजार वर्षांहून अधिक इतिहास लाभलेल्या या मंदिराचा उल्लेख विविध पुराणे आणि ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आढळतो. हेमाडपंथी स्थापत्यशैली, समृद्ध शिल्पकला आणि धार्मिक परंपरांचा अद्वितीय संगम असलेले हे मंदिर देश-विदेशातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मंजूर केलेला महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा हा कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीला अधिक बळकटी देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरत आहे. मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सोयी-सुविधा आणि पर्यटन विकास या सर्व बाबींचा समन्वय साधत हा आराखडा राबविण्यात येत आहे. विकास आणि वारसा संवर्धन यांचा समतोल राखत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे मंदिर परिसराचे वैभव अधिक वृद्धिंगत होणार असून भाविकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी